नोटा बदलून देण्याची बतावणी करुन अभिनेत्याची फसवणुक
सतरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – चित्रपटाच्या निर्मितीसाठी पाच कोटीचे फायनान्स मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन करुन शंभर रुपयांच्या नोटाच्या बदल्यात पाचशे रुपयांच्या नोटा देण्याची बतावणी करुन चारजणांच्या टोळीने एका सिनेअभिनेत्याची सुमारे सतरा लाखांची फसवणुक केल्याची घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोशनकुमार, महेंद्रसिंग, रमेश आणि आयुब नाव सांगणार्या चौघांविरुद्ध माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाचशे रुपयांच्या सतरा लाखांच्या नोटा दिल्यानंतर आरोपींनी पलायन केले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा माटुंगा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
अभिनेता अभय शंकर झा हा मालाड परिसरात राहतो. अभिनय क्षेत्रात असल्याने त्याची अनेक लोकांशी संपर्क येत असतो. काही दिवसांपूर्वी त्याची रोशनकुमार याच्याशी ओळख झाल होती. त्याने तो फायनान्स व्यवसायात असल्याचे सांगून एखादा मोठा प्रोजेक्ट असल्यास आपण मदत करु असे त्याला आश्वासन दिले होते. त्यामुळे अभय झा याने त्याला एक चित्रपट करण्याची इच्छा असल्याचे सांगून त्यासाठी पाच कोटी खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. याबाबत त्याने रोशनकुमारशी चर्चा केल्यानंतर त्याने त्याला होकार दर्शविला होता. याच चित्रपटाबाबत त्यांची जुहू येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. यावेळी त्याने त्याच्या चित्रपट प्रोजेक्टसाठी फायनान्स करण्याचे आश्वासन दिले होते.
याच दरम्यान त्याने त्याची महेंद्रसिंग, रमेश आणि आयुब यांच्याशी ओळख करुन दिली होती. या ओळखीनंतर महेंद्रसिंगने त्याला पाच कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी रोशनकुमारने अभय झा याला फोन करुन महेंद्रसिंगच्या बहिणीचे लग्न आहे. त्यासाठी सतरा लाखाची गरज आहे. त्याच्याकडे शंभर रुपयांच्या नोटा असून त्याने त्याला पाचशे रुपयांच्या नोटा देऊन त्याच्याकडून शंभर रुपयांच्या नोटा घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे अभय झा याने पाचशे रुपयांच्या नोटांची व्यवस्था केली होती. ठरल्याप्रमाणे 4 ऑगस्टला दुपारी एक वाजता ते दादर येथील स्वामी नारायण मंदिरात पाचशे रुपयांच्या नोटा देऊन शंभर रुपयांच्या नोटा घेण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे आयुब आला आणि त्याने त्याला त्याच्या कारमधून वडाळा येथे आणले.
तिथे आल्यानंतर महेंद्रसिंगने त्याला फोन करुन पाचशे रुपयांच्या नोटा रमेशला देण्यास सांगितले. त्यामुळे त्याने नोटांनी भरलेली बॅग रमेशला दिली. रमेशने शंभर रुपयांच्या नोटा घेऊन येतो असे सांगून निघून गेला आणि परत आला नाही. त्यामुळे अभय झा याने रोशनकुमार, रमेश आणि महेंद्रसिंग यांना कॉल केला, मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. दोन दिवस तो सतत त्यांना कॉल करत होता, मात्र त्यांनी कॉल घेतला नाही, नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच अभय झा याने घडलेला प्रकार माटुंगा पोलिसांना सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रोशनकुमार, महेंद्रसिंग, रमेश आणि आयुब नाव सांगणार्या चारही भामट्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.