मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सिमकार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून कारवाईची भीती दाखवून एका 26 वर्षांच्या अभिनेत्रीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे साडेसहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. टूकॉलरवर मोबाईल क्रमांकाची तपासणी केल्यानंतर या अभिनेत्रीला फसवणुकीचा हा प्रकार समजल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या गुन्ह्यांत ओशिवरा पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
देबचद्रीम अरुण सिंघारॉय ही अभिनेत्री असून ती मूळची कोलकाताची रहिवाशी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ती तिच्या मेडसोबत जोगेश्वरीतील गुलशननगर परिसरात राहते. सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता ती तिच्या राहत्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो एअरटेल कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तिच्या सिमकार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून तिची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर त्याने तिला दिल्ली पोलिसांशी कनेक्ट केला होता. त्यानंतर तिच्याशी एका व्यक्तीने संभाषण करताना तो दिल्लीतील पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले.
व्हेरीफिकेशनसाठी तिला एक व्हिडीओ कॉल येईल. त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहावे, आजूबाजूला कोणालाही येऊ देऊ नका. सोबत तुमचा आधारकार्ड ठेवा असे सांगून कॉल कट केला. पावणेअकरा वाजता तिला एका मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल आला होता. समोरील व्यक्तीने पोलीस गणवेश घातला होता. त्याने तिचा आधारकार्डची माहिती मागणी केली. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईल सर्वोच्च न्यायालयाचे एक नोटीस पाठविली होती. तिच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत खाती उघडण्यात आले असून ते सर्व खाती तसेच पासपोर्ट फ्रिज होणार आहे. त्यामुळे तिला विदेशात जाता येणार नाही.
यावेळी या पोलीस अधिकार्याने तिला साडेसहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले. चौकशी पूर्ण होताच तिला तिचे पैसे परत पाठविले जाईल असे सांगितले. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती, त्यामुळे तिने तिच्या बँक खात्यातून संबंधित बँक खात्यात साडेसहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती तिला सतत व्हिडीओ कॉल करत होता. तो मोबाईल क्रमांक तिने टूकॉलरवर चेक केला असता तो क्रमांक स्कॅम असल्याचे दिसून आले.
अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना संबंधित व्यक्तींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली, त्या बँक खात्याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.