मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – स्वतच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने सिनेअभिनेत्रीच्या घरातून सोन्याच्या चार बांगड्या चोरी करुन पळून गेलेल्या एका 24 वर्षीय मोलकरीण तरुणीला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. तिच्याकडून चोरीचे दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
करुणा जयगोपाळ वर्मा ही सिनेअभिनेत्री मालाड येथील एव्हरशाईन, साईबाबा पार्कच्या न्यू आर्शिवाद अपार्टमेंटमध्ये राहते. तिने अनेक हिंदी मालिकांसह चित्रपटामध्ये काम केले आहेत. घरात एकटी राहत असल्याने तिने मदतनीस म्हणून एका तरुणीला तिच्या घरी कामावर ठेवले होते. गेल्या एक महिन्यांपासून ती तिच्याकडे काम करत होती. तिच्या आई-वडिलांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस होता. त्यामुळे तिने तिच्या आईसाठी चार सोन्याच्या बांगड्या बनवून ठेवल्या होत्या. या बांगड्या तिने तिच्या कपाटात ठेवले होते. अनेकदा शूटींगनिमित्त ती बाहेर असल्याने तिच्या घरी तिची मोलकरीण राहत होती. तिला सोडून तिच्या घरात कोणीही येत नव्हते.
सोमवारी 17 मार्चला तिने तिचे कपाटाची पाहणी केली असता तिला सोन्याच्या चार बांगड्या दिसून आल्या नाही. तिने कपाटात सर्वत्र शोध घेतला, मात्र तिला कुठेच बांगड्या सापडल्या नाही. सोन्याच्या या चार बांगड्या अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीत तिने तिच्या मोलकरणीवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. यावेळी 24 वर्षांच्या मोलकरणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली.
पुढच्या महिन्यांत तिचे लग्न होणार होते. लग्नासाठी तिला पैशांची गरज होती. त्यामुळे कामादरम्यान तिने कपाटातून सिनेअभिनेत्रीच्या आईचे चार सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याची कबुली दिली. या बांगड्या विक्री करुन त्या पैशांतून लग्नाचा खर्च करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिला पोलिसांनी अटक करुन या चोरीचा पर्दाफाश केला. तिच्याकडून गुन्ह्यांतील दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.