सिनेअभिनेत्री नूर मलाविका दास हिच्या मृत्यूने शोककळा
मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – चार दिवसांपूर्वी सिनेअभिनेत्री नूर मलाविका दास हिचा अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरातील राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने सिनेसृष्टीत प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. नूर ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती, त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान या घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. रविवारी एका खाजगी एनजीओने तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नूर ही मूळची आसामची रहिवाशी असून तिथेच तिचे आई-वडिल आणि बहिण राहते. शिक्षण पूर्ण केल्यांनतर तिने कतार एअरवेजमध्ये एअर हॉस्टेल म्हणून काम केले होते. मात्र तिला बॉलीवूडचे प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे ही नोकरी सोडल्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली होती. सुरुवातीच्या काळात प्रचंड स्ट्रगल केल्यानंतर तिला काही बॉलीवूडच्या चित्रपटासह वेब सिरीजमध्ये काम मिळाले होते. सिनेअभिनेत्री काजोलसोबत द ट्रायल या वेब सिरीजमध्ये तिच्या भूमिकेची प्रचंड प्रशंसा झाली होती. या व्यक्तिरिक्त तिने सिसकियॉं, वॉकमन, तिखी चटनी, जगन्या उपे, चरमसुख, देखी अंदेखी आणि बॅकरोड हसल या चित्रपटासह वेबसिरीजमध्ये काम केले आहे. सध्या ती अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहत होती. चार दिवसांपासून तिला कोणीच पाहिले नव्हते, ती तिच्या फ्लॅटमधून बाहेर पडली नव्हती. त्यातच तिच्या घरात दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती ओशिवरा पोलिसांना दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी तिचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला. तिने आत्महत्या केल्याचे नंतर उघडकीस आले. मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. नूर ही फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. तिचे वयोवृद्ध आई-वडिल आणि बहिण आसाममध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना नूरच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. वयोवृद्ध असल्याने आई-वडिल मुंबईत येऊ शकत नव्हते तर बहिणीने आजारपणाचे कारण सांगून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली होती. त्यामुळे तिचा मृतदेह एका एनजीओने ताब्यात घेतला होता. रविवारी तिच्या पार्थिवावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांपासून नूर ही मानसिक तणावात होती. तिच्यावर एका खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरु होते. मात्र या उपचारातून तिला काहीच फरक जाणवत नव्हता. त्यामुळे तिने स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते. तिच्या घरातून पोलिसांनी मोबाईल, एक डायरी आणि काही औषधे जप्त केले आहेत. या औषधांवरुन नूरला प्रचंड राग येत होता. तिला तिच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नसल्याचे बोलले जाते. नूर ही सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय होती. तिचे सोशल मिडीयावर १ लाख ६३ हजाराहून अधिक फॉलोअर आहेत. तिने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होत. त्यात तिने स्वतची तुलना आरशासोबत केली होती. अठरा दिवसांपूर्वी तिने मुंडन केले होते, त्याचे व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर अपलोड केले होते. ३२ वर्षांची नूर ही मूळची आसामची रहिवाशी असून तिने कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले होते. नंतर ती अभिनय क्षेत्रात आली होती. दरम्यान नूरच्या मृत्यूची चौकशी करण्याची माहिती अखिल भारतीय सिनेकामगार संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान एडीआरची नोंद करुन ओशिवरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. नूरच्या नातेवाईकासह मित्र-मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.