मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२४
मुंबई, – स्टार प्लसच्या दिल को तुमसे प्यार हुआ या मालिकेत काम देण्याची बतावणी करुन एका २९ वर्षांच्या स्ट्रग्लर ऍक्टरची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे सव्वाचार लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
निशांतकुमार मनोज सिंग हा स्ट्रग्लर ऍक्टर असून अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतो. ऍक्टिंग कामासाठी त्याने काही व्हॉटअप ऑडिशन ग्रुप जॉईन केले होते. त्यातील एका ग्रुपमधून त्याला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. अभयकुमार नाव असलेल्या या व्यक्तीने तो कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून त्याला व्हॉटअपवर त्याचे ऑडिशन पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्याने त्याचे ऑडिशन व्हॉटअप ग्रुपमध्ये पाठवून दिले होते. २९ मेला तयाला त्याने फोन करुन स्टार प्लसवर दिल को तुमसे प्यार हुआ या मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. या मालिकेत काम करण्यासाठी त्याला रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल. ही फी भरल्यानंतर त्याच्यासोबत दोन वर्षांचा करार होईल आणि प्रोडेक्शन हाऊसकडून त्याला चेक मिळेल असे सांगितले. त्यानंतर निशांतकुमारने त्याला त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवून दिले होते. यावेळी त्याने त्याला स्नेहा शर्मा या तरुणीचा फोन क्रमांक दिला होता. मात्र एक ते दोन आठवडे होऊन त्यांनी त्याला पुन्हा संपर्क साधला नाही. त्यामुळे त्याने अभयकुमार आणि स्नेहाला संपर्क साधला होता. यावेळी ते दोघेही विविध कारण सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होते.
मालिकेत काम देण्याची बतावणी करुन या दोघांनी त्याच्याकडून २८ मे ते ८ जुलै २०२४ या कालावधीत गुगल पे आणि बँक खात्याद्वारे सव्वाचार लाख रुपये घेतले होते, मात्र त्याला मालिकेत काम मिळवून दिले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने घडलेला प्रकार वर्सोवा पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अभयकुमार आणि स्नेहा शर्मा नाव सांगणार्या दोन्ही सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.