मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील एका अभिनेत्रीच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या मोलकरणीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. संगीता विवेक बर्मन असे या २६ वर्षीय मोलकरणीचे नाव असून तिच्यावर कपाटातून आठ लाखांचा महागडा रोलेक्स कंपनीचा घड्याळ चोरीचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच ती पळून गेली होती, अखेर पाच महिन्यानंतर तिला अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. आई आजारी असल्याचा बहाणा करुन तिने अभिनेत्रीच्या घरातून पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
रुही दिलीप सिंग ही अभिनेत्री गोरेगाव येथे एकटीच राहत असून ऍक्टींग करते. १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी तिच्या वाढदिवसाला तिच्या एका मित्राने आठ लाख रुपपयांचा ऑसस्टर परपॅच्युल रोलेक्स घड्याळ भेट म्हणून दिले होते. ते घड्याळ ती ठराविक कार्यक्रमांत घालत होती. २९ फेब्रुवारी २०२४ पासून तिच्याकडे संगीता ही घरकामासाठी आली होती. ती मूळची मध्यप्रदेशच्या जबलपूर, शहाजपुरीची रहिवाशी असून एका खाजगी एजन्सीच्या मार्फत तिला तिच्या घरी घरकामासाठी पाठविण्यात आले होते. २७ फेब्रुवारीला तिला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे होते, त्यामुळे तिने ते रोलेक्स कंपनीचे घड्याळ घातले होते. घरी आल्यानंतर तिने ते घड्याळ कपाटात ठेवले होते. १४ मार्चला सकाळी तिला संगीता ही घरातील काम करताना काहीतरी लपवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने तिच्याकडे जाऊन विचारणा केली होती. यावेळी ती प्रचंड घाबरली होती. तिने काही नाही साफसफाई करत असल्याचे सांगून तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्या एकूण हालचालीवर तिला संशय आला होता.
दोन तास काम केल्यानंतर ती तिच्याकडे आली आणि तिने तिची आई आजारी आहे, त्यामुळे तिला तातडीने गावी जावे लागणार असल्याचे सांगितले. तिने खूप विनंती केल्यानंतर तिने तिला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर दुपारी संगीता तिची बॅग घेऊन निघून गेली होती. ४ एप्रिलला तिला एका इव्हेंटला जायचे होते. त्यामुळे तिने कपाटातून घड्याळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला घड्याळ कुठेच सापडले नाही. आई आजारी असल्याचा बहाणा करुन संगीतानेच तिच्या रुममध्ये साफसफाई करताना घड्याळ चोरी करुन गावी पलायन केले असावे असा तिला संशय आला होता. त्यामुळे तिने गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संगीताविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन संगीताचा शोध सुरु केला होता.
ती तिच्या गावी गेल्याचा संशय व्यक्त करुन पोलीस पथक तिथे गेले होते. गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या संगीताला अखेर तिच्या गावातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच तो घड्याळ चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. चोरीच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर संगीताला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.