अभिनेत्रीच्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची आत्महत्या
ट्यूशनला जाण्यास प्रवृत्त केले म्हणून इमारतीवरुन उडी घेतली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जुलै 2025
मुंबई, – गुजराती अभिनेत्रीच्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी कांदिवली परिसरात घडली. ट्यूशनला जाण्याची इच्छा नसताना अभिनेत्री आईने जबदस्तीने ट्यूशनला जाण्यास प्रवृत्त केले म्हणून या मुलाने त्याच्या निवासी इमारतीवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मुलाच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी सांगितले.
ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता कांदिवलीतील सी ब्रुक इमारतीमध्ये घडली. 57 मंजली याच इमारतीमध्ये गुजराती अभिनेत्री ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला चौदा वर्षांचा एक मुलगा असून तो मालाडच्या रायन इंटरनॅशनल शाळेत नववीत शिकत होता. घरापासून काही अंतरावर त्याचे एक खाजगी ट्यूशन सुरु होते. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्याच्या आईने त्याला ट्यूशनमध्ये जाण्यास सांगितले, मात्र त्याने त्याला ट्यूशनला जाण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यावर त्याच्या आईने त्याला ट्यूशनला जावेच लागेल असे सांगून त्याला ट्यूशनला जाण्यास प्रवृत्त केले होते. काही वेळानंतर तो घराबाहेर पडला.
काही वेळानंतर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला हा मुलगा आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. ही माहिती गुजराती अभिनेत्रीला समजताच तिने त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुजराती अभिनेत्रीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून तिचे तिच्या मुलासोबत ट्यूशनवर जाण्याबाबत वाद झाल्याचे उघडकीस आले होते. त्यातून रागाच्या भरात तिच्या मुलाने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे.
या जबानीत तिने कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. त्यामुळे या जबानीनंतर कांदिवली पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. मुलाचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या पालकांना सोपविण्यात आला. इतक्या क्षुल्लक कारणावरुन अभिनेत्रीच्या चौदा वर्षांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.