बॉलीवूडच्या कलाकारांना पाकिस्तातून जिवे मारण्याची धमकी

कपिल शर्मा, रेमो डिसुझा, राजपाल यादव, सुगंधा मिश्राचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – बॉलीवूडसह टिव्ही क्षेत्राशी काही कलाकारांना पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात हास्यकलाकार राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, अभिनेता कपिल शर्मा आणि कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांचा समावेश आहे. या सर्वांनी आंबोली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांना धमकी आल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर धमकीच्या स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तपास सुरु केला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत राजपाल यादव यांना एका अज्ञात व्यक्तीने मेल पाठविला होता. त्यात राजपालसह त्याच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुझ्या रोजच्या घडामोडीवर आमचे बारीक लक्ष आहे. तुझ्याकडे गांभीर्याने पाहण्याची आता गरज आहे. ही धमकी प्रसिद्धीसह तुला त्रास देण्यासाठी दिली नाही. योग्य वेळेस स्वतला सावर, वादग्रस्त विधान करु नकोस नाहीतर परिणामाला सामोरा जा असा मजकूर देण्यात आला होता. त्यात राजपालसह कपिल शर्मा याच्या नावाचाही उल्लेख होता. या धमकीनंतर राजपाल यादवने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांत कपिल शर्मा, रेमो डिसुझा आणि सुगंधा मिश्रा यांनाही अशाच प्रकारे जिवे मारण्याची धमकी आली होती.

या धमकीनंतर त्यांनी ओशिवरा आणि आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. प्राथमिक तपासात या धमक्या पाकिसतानातून आल्याचे उघडकीस आले आहे. या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यांभरात कपिल शर्मा, रेमो डिसुझा, राजपाल यादव आणि सुगंधा मिश्रा यांना जिवे मारण्याच्या धमकी मिळाल्याने बॉलीवूडसह टिव्ही क्षेत्राशी संबंधित कलाकारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page