किंगस्टन विद्यापीठात प्रवेशाच्या नावाने महिलेची फसवणुक
पैशांचा अपहार केल्याप्रकरणी तीन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – दिल्लीच्या एका खाजगी एनजीओच्या मदतीने मुलाला इंग्लंडच्या किंगस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तीन ठगांनी सुमारे नऊ लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी तिन्ही ठगाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आशुतोष पगारे, विकास यादव आणि रवी रंजन अशी या तिघांची नावे असून या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
मानसी संजय मळेकर ही ४७ वर्षांची महिला तिचा मुलगा दिपसोबत विक्रोळीतील कन्नमवारनगर परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून त्यांच्या पेंशनवर तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. बारावीची परिक्षा दिल्यानंतर दिपला बॅचलर ऑफ फायनान्समध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जायचे होते. इंग्लंडच्या किंगस्टन विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्याला आशुतोषने दिल्लीच्या एका खाजगी एनजीओच्या मदतीने त्याला किंगस्टन विद्यापीठात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याला एक वर्षांची नऊ लाख दहा हजार रुपयांची फी एकदम भरावे लागतील असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत मानसी मळेकर हिने त्याला टप्याटप्याने नऊ लाख दहा हजार रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्याने तिला प्रवेशासाठी ६० हजार रुपये भरल्याची पावती दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्यांनी किंगस्टन विद्यापीठात संपूर्ण वर्षांची फी भरल्याचे सांगितले.
मात्र जून २०२२ रोजी तिच्या मुलाची फी म्हणून भरलेली रक्कम परत घेण्यात आली. त्यामुळे तातडीने फी भरा नाहीतर प्रवेश होणार नाही अशी विचारणा विद्यापीठाकडून त्यांना देण्यात आली होती. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. तिने वर्षांची संपूर्ण फीची रक्कम आशुतोषला दिली होती, तरीही तिला विद्यापीठाकडून अशा प्रकारे विचारणा झाली होती. त्यामुळे तिने आशुतोषकडे विचारणा केली. यावेळी त्याने फीची रक्कम पुन्हा भरुन प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. मात्र त्याने फीची रक्कम जमा केली नसल्याने त्याला तिथे प्रवेश मिळू शकला नाही. आशुतोषकडे पुन्हा विचारणा केल्यानंतर त्याने विकास आणि रवीकडे पैसे दिले होते, त्यामुळे पैसे जमा केले नसतील तर त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने विक्रोळी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आशितोष पगारे, विकास यादव आणि रवी रंजन या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.