वडाळा येथून अफगाणी नागरिकाला बोगस दस्तावेजासह अटक

गेल्या सतरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – वडाळा येथे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एका अफगाणी नागरिकाला बोगस दस्तावेजासह गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हबीबुल्लाह प्रांग ऊर्फ जहीर अली खान असे या आरोपी नागरिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने सोमवार २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हबीबुल्लाह हा गेल्या सतरा वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास असून त्याने भारतीय नागरिक असल्याचे काही बोगस दस्तावेज बनविल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले.

वडाळा परिसरात काही अफगाणी नागरिक बेकायदेशीपणे वास्तव्यास असल्याची माहिती युनिट पाचच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, सदानंद येरेकर, सुनिता भोर, अजीत गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, अंकुश न्यायनिर्गुणे, पोलीस हवालदार सुजीत घाडगे, सुनिल जाधव, विलास देसाई, मिलिंद निरभवणे, नितेश विचारे, इक्बाल सिंग, अविनाश चिलप, तानाजी पाटील, पोलीस शिपाई सरफरोज मुलानी, युवराज सावंत, भाऊसो पवार, पोलीस हवालदार चालक हरेश कांबळे यांनी आरएके नगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

बुधवारी २१ फेब्रुवारीला या पथकाने जहीर अली खान या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे पोलिसांना जहीर नावाचे पॅनकार्ड आणि वाहन चालक परवाना सापडला. तो स्वतला भारतीय नागरिक असल्याचे सांगत होता. मात्र तो चुकीची माहिती सांगून दिशाभूल करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने तो अफगाणी नागरिक असल्याची कबुली देताना गेल्या २००७ पासून मुंबईत वास्तव्यास असल्याचे सांगितले. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अफगाणी पासपोर्ट, अफगाणी नागरिक असल्याचे ओळखपत्र, व्हॅक्सीनेशन प्रमाणपत्र जप्त केले आहे.

या कालावधीत त्याने स्वतचे जहीर खान या नावाने पॅनकार्ड, वाहन चालक परवाना तसेच इतर बोगस दस्तावेज बनविले होते. त्यानंतर तो सर्वांना भारतीय नागरिक असल्याचे सांगत होता. त्याच्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page