मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 सप्टेंबर 2025
मुंबई, – शक्तीवर्धक औषधांच्या नावाखाली एका 35 वर्षांच्या हॉटेलमधील वेटरची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याची घटना आग्रीपाडा परिसरात उघडकीस आली आहे. औषधांसाठी घेतलेल्या सुमारे 44 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा आग्रीपाडा पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत. ऑनलाईन शक्तीवर्धक गोळ्या मागवणे या वेटरला चांगलेच महागात पडले
सध्या सोशल मिडीयावर अनेक शक्तीवर्धक औषधांच्या जाहिराती अपलोड केल्या जात आहे. शक्तीवर्धक औषध कशी आरोग्यास चांगली आहे याचे रिल्सदेखील सोशल मिडीयावर व्हायरल केले जात आहे. या शक्तीवर्धक औषधांच्या नावाने तक्रारदाराची फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे. 35 वर्षांचा तक्रारदार मूळचा बिहारच्या बेहराईचचे रहिवाशी असून गेल्या बारा वर्षांपासून सातरस्ता परिसरात राहतो. सातरस्ता परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करतो.
19 सप्टेंबरला त्याला एका अज्ञात महिलेचा कॉल आला होता. तिने ती एका नामांकित औषध कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तिच्या कंपनीने शरीरास शक्तीवर्धक असलेले औषध बनविले आहे. त्याचा सेवन केल्यास शरीरास खूप फायदे होतात. तिच्याकडून औषधांची माहिती घेतल्यानंतर त्याने ते औषध ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने तिला ऑनलाईन अकराशे रुपये ट्रान्स्फर केले होते. दुसर्या दिवशी त्याला पुन्हा एका महिलेने कॉल करुन औषधांसाठी त्याला डिपॉझिट रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर त्याचे शक्तिवर्धक औषध कुरिअरने पाठविले जातील असे सांगितले. त्यामुळे त्याने तिला बाराशे रुपये पाठविले होते.
त्यानंतर त्यांना कुरिअर कंपनीतून कॉल आला होता. त्यांचे औषध डिलीव्हरीसाठी काही रक्कम भरावी लागेल, नाहीतर ते औषध त्यांना डिलीव्हर होणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याने दिलेल्या बँक खात्यात काही रक्कम पाठविली होती. अशा प्रकारे त्याने शक्तिवर्धक गोळ्यासाठी संबंधित व्यक्तींना टप्याटप्याने 43 हजार 800 रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम पाठवून त्याला शक्तिवर्धक गोळ्या मिळाल्या नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी महिलेसह इतर आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.