पती-पत्नीच्या संबधात अडसर ठरणार्या चार वर्षांच्या मुलीची हत्या
अपहरणासह हत्येच्या गुन्ह्यांत सावत्र पित्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जुलै 2025
मुंबई, – पती-पत्नीच्या संबंधात अडसर ठरणार्या चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरणानंतर हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रात फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच इम्रान दस्तगीर शेख या 42 वर्षांच्या सावत्र पित्याला अवघ्या बारा तासांत अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने मृत मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रात फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
40 वर्षांची नाझिया इम्रान शेख ही अॅण्टॉप हिल येथील मिरा दातार दर्गाजवळील राजीव गांधीनगर, न्यू ट्रान्झिंट कॅम्प परिसरात राहते. ती सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. 21 वर्षांपूर्वी तिचे अबुल कलाम आझाद अंकुजी याच्याशी विवाह झाला होता. त्याच्यापासून त्याला सोहेल, मेहक, अल्फिया, आमरीन आणि अमायरा असे पाच मुले आहेत. त्यापैकी मेहकचे गेल्याच महिन्यांत आजाराने निधन झाले होते. दिड वर्षांपूर्वी तिने तिचा पती अबुलशशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर इम्रान शेख याच्या संपर्कात आली होती. मैत्रीनंतर या दोघांनी मार्च 2025 रोजी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात लग्न केले होते. इम्रान हा विवाहीत असून त्याच्या पत्नीचे फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले होते. त्याला तीन मुले आहेत.
नाझियाची अमायरा ही चार वर्षांची मुलगी असून सोमवारी रात्री ती घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊन ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिने तिचा सर्वत्र शोध घेतला, परिसरातील लोकांसह मित्र, नातेवाईकांचा तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिने रात्री उशिरा तिची मुलगी मिसिंग झाल्याची अॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तिचा शोध सुरु असताना मंगळवारी सकाळी कुलाबा येथील ससून डॉक समुद्रात एका चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह कुलाबा पोलिसांना सापडला होता.
हा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यात या मुलीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. ही माहिती नंतर अॅण्टॉप हिल पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक तपासात या मुलीला तिच्या सावत्र पित्यासोबत काही लोकांनी शेवटचे पाहिले होते. हा प्रकार उघडकीस येताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत अॅण्टॉप हिल पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या हत्येत इम्रानचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅण्टॉप हिल पोलिसांचे दहाहून अधिक पथक नियुक्त करण्यात आले होते.
या पथकाने लोअर येथून वरळी बसस्थानकावर मुंबईतून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या इम्रानला ताब्यात घेतले होते. चौकशीत अमायरा ही पती-पत्नीच्या संबंधात अडसर ठरत होती. त्यामुळे त्याने तिच्या हत्येची योजना बनविली होती. सोमवारी तिचे अपहरण करुन तो तिला भाऊचा धक्का येथे घेऊन आला. तिथेच तिची गळा आवळून हत्या करुन त्याने तिचा मृतदेह समुद्रात फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर बुधवारी दुपारी त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशवकुमार कसार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, किशोरकुमार राजपूत, महिला पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, प्रदीप पाटील, आण्णासाहेब कदम, कांबळे, निगुडकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सिद्धकी, राहुल वाघ, केदार उमाटे, गौरव शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक सरोजिनी इंगळे, पूजा शिर्के, पोलीस हवालदार टेळे, गस्ते, सानप, ठोके, सिंग, तांबे, पोलीस शिपाई आमदे, किरतकर, सजगणे, पाटील, माने, खोत, बार्शी, चव्हाण, सनगर, भोसले, घाडगे, ठाकूर, महिला पोलीस शिपाई मांढरे यांनी केली.