अश्लील व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप करुन अटकेची धमकी

वयोवृद्ध ज्योतिषीला गंडा घालणार्‍या सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2026
मुंबई, – मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप करुन अटकेसह बदनामीची धमकी देऊन एका वयोवृद्ध ज्योतिषीची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ज्योतिषीच्या तक्रारीवरुन अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी दिल्लीच्या क्राईम ब्रॅचच्या तोतया अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.

60 वर्षांचे तक्रारदार ज्योतिषी असून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत सायन-कोळीवाडा परिसरात राहतात. त्यांचा ज्योतिषीचा व्यवसाय असून त्यांचे मुले शिक्षण घेत आहेत. 11 मार्चला ते त्यांच्या कामासाठी गोवंडी येथे गेले होते. काम संपल्यानंतर ते त्यांच्या घरी जात होते. सायंकाळी सहा वाजता जीटीबी रेल्वे स्थानकातून ते त्यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप कॉल केला होता. त्याच्या डिपीवर दिल्ली क्राईम ब्रॅचचा फोटो होता. या व्यक्तीने तो दिल्ली क्राईम ब्रॅचमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहतात. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई होणार आहे.

त्यातून त्यांना सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर त्याने त्यांना एक मोबाईल क्रमांक देऊन त्यांना माफीनामा पाठविण्यास सांगितले. त्यांनी माफीनामा पाठविला नाहीतर त्यांची टिम त्यांना अटक करुन दिल्लीत आणतील. त्यातून त्यांची प्रचंड बदनामी होईल. माफीनामा तसेच त्यांना 11 हजार 520 रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र संबंधित व्यक्ती त्यांना सतत कॉल करुन अटकेसह बदनामीची धमकी देत होती. त्यामुळे बदनामीला घाबरुन त्यांनी त्यांना पैसे पाठविले होते. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे आणखीन 26 हजाराची मागणी सुरु केली होती.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याला पैसे पाठविण्यास नकार दिला. हा प्रकार त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. त्यानेही त्याची अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तिथे उपस्थित पालिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तोतया क्राईम ब्रॅचच्या अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page