सीआयएसएफच्या उपनिरीक्षकाची अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक
सोशल मिडीयावर फ्री चॅनेलच्या अॅपवर क्लिक करणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – सोशल मिडीयावर रिल पाहत असताना फ्री चॅनेलच्या अॅपवर क्लिक करणे एका सीआयएसएफच्या पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले. क्लिक ओपन करताना त्याचा मोबाईल हॅक झाला आणि अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या बँक खात्यातून सुमारे 34 हजाराचे ऑनलाईन व्यवहार करुन त्याचीं फसवणुक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध अॅण्टॉप हिल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. 9 मार्च ते 10 मार्चला तक्रारदार उपनिरीक्षक त्यांच्या घरी असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पंकजकुमार रामभजन मांझी हे त्यांची पत्नी आणि मुलासोबत अॅण्टॉप हिल येथील जीसीएस कॉलनी, सेक्टर क्रमांक सातमध्ये राहतात. सध्या सीआयएसएफमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराज आंतररराष्ट्रीय विमातळावर आहे. त्यांची पत्नीही सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक म्हणून काम करते. 9 मार्चला ते मेडीकल सुट्टीवर असल्याने घरातच आराम करत होते. इंटाग्रामवर काही रिल पाहत असताना त्यांना एका चॅनेलचे फ्री अॅपची जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्यांनी ते चॅनेल सब्रस्क्राईब करण्यासाठी लिंक क्लिक केले होते.
याच दरम्यान त्यांचे मोबाईल हॅक झाले होते. सुरुवातीला त्यांना काहीच कळले नाही, त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर त्यांचा मोबाईल अपडेट मोडवर आला होता. त्यामुळे त्यांनी मोबाईल अपडेट केला होता. याच दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार केले होते. दुसर्या दिवशी 10 मार्चला ते मेडीकल शॉपमध्ये काही औषधे आणण्यासाठी गेले होते, मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना पेमेंट करता आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील बॅलेन्स चेक असता त्यात दोन रुपये रक्कम शिल्लक असल्याचे दिसून आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी अॅपमधून जाऊन सर्व व्यवहाराची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना 9 मार्च ते 10 मार्च 2026 या कालावधीत त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार तसेच या व्यवहारातून त्यांच्या खात्यातून 34 हजार रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. चॅनेलचे फ्री अॅपची लिंक ओपन केल्यानंतर त्यांचा मोबाईल अचानक हॅक झाला होता, याच दरम्यान अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार करुन ही फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँकेला ही माहिती सांगून त्यांचे बँक खाते फ्रिज करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. फ्री चॅनेलच्या अॅपच्या लिंकवर क्लिक करणे या उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले होते.