24 वर्षांच्या प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक
चारित्र्यावर संशय घेऊन आक्षेपार्ह विधान करत असल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2026
मुंबई, – कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या एका 24 वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर फैजुल मोहम्मद खान याला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे ती मानसिक तणावात होती, त्यातून तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सहा पानी सुसायट नोट लिहून ठेवले होते. हा फैजुलविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर फैजुलला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी 8 मार्चला सायंकाळी सात ते सोमवारी 9 मार्चला सकाळी दहाच्या सुमारास अॅण्टॉप हिल रावळी कॅम्प परिसरात घडली. 62 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार हे अॅण्टॉप हिल परिसरात राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका असून मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. ती सध्या तिच्या पतीसोबत उरण येथे राहते. 24 वर्षांची लहान मुलगी श्रुती (नावात बदल) ही सध्या शिक्षण घेते. रविवारी सायंकाळी सात वाजता श्रृती ही तिच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेली. त्यांनी तिला जेवणासाठी बाहेर बोलाविले होते, मात्र तिने जेवणास नकार दिला होता. त्यामुळे ते त्यांच्या पत्नीसोबत बाहेर जेवणासाठी गेले होते. रात्री दहा वाजता ते घरी आले होते. यावेळी श्रृतीच्या रुमची लाईट बंद होती. ती झोपली असेल म्हणून त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
सोमवारी सकाळी दहा वाजता ती रुममधून बाहेर आली नाही. त्यामुळे त्यांनी तिला हाक मारली, मात्र तिने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ होऊन श्रृती रुमबाहेर आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना श्रृतीने घरातच नॉयलॉनच्या पांढर्या रंगाच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी अॅण्टॉप हिल पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान पोलिसांना श्रृतीच्या रुममध्ये तिने लिहिलेली सहा पानांचे सुसायट नोट सापडले. या सुसायट नोटची पाहणी केल्यानंतर श्रृतीचे वरळी येथे राहणार्या फैजुल खान नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. तो तिच्या चारित्र्यावर सतत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करत होता. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला फैजुल हाच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तसेच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.
त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी फैजुल खान या तरुणाविरुद्ध श्रुतीच्या चारित्र्याविषयी आक्षेपार्ह विधान करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांनी दुजोरा दिला आहे.