एअर इंडियाच्या पायलटची सायबर ठगाकडून फसवणुक
चांगला परताव्याच्या आमिषाने गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – माझगाव येथे राहणार्या एअर इंडियाच्या एका पायलटची सायबर ठगाने सुमारे तीन लाखांची फसवणुक केली. चांगला परतावा देतो असे सांगून त्यांना विविध शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गंडा घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून भायखळा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.
माझगाव येथे राहणारे ३८ वर्षांचे तक्रारदार एअर इंडियामध्ये पालट म्हणून काम करतात. मे महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळवून देतो असे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना एक लिंक पाठवून त्यात गुंतवणुक केलेल्या व्यक्तींना कशा प्रकारे फायदा होत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईलवर संपर्क साधून त्याच्याकडून शेअरमार्केटची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याशी संभाषण केल्यानंतर त्याला त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्याने वेगवेगळ्या शेअरमध्ये सुमारे तीन लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना १६ लाख ३० हजार रुपयांचा फायदा झाल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यापैकी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ती रक्कम काढता आली नाही. त्यामुळे त्यांनी त्याला फोन करुन विचारणा केली असता तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भायखळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.