शारजाहून आलेल्या ३४ वर्षीय बांगलादेशी नागरिकाला अटक
२१ वर्षांपूर्वी भारतात आला व बारा वर्षांपूर्वी पासपोर्ट मिळविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शारजाहून आलेल्या एका ३४ वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. नुरुल अमीन आदमअली गाझी असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नुरुल हा २१ वर्षांपूर्वी भारतात आला होता, कोलकाता येथे वास्तव्यास असताना त्याने भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनवून बारा वर्षांपूर्वी बोगस भारतीय पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गुरुवारी १२ सप्टेंबरला नुरुल हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्याने इमिग्रेशन अधिकार्यांना त्याचे भारतीय पासपोर्ट, बांगलादेश देशाचा व्हिसा पेपर आणि बोर्डिंग पास सादर केले होते. तो शारजाहून मुंबईत आला होता. त्याच्या पासपोर्टवरुन तो बांगलादेशातून कुवेतला गेल्याची नोंद दिसून आली. तो अधूनमधून बांगलादेशात गेला होता, त्यामुळे त्याला बांगलादेशात जाण्यामागील कारण विचारण्यात आले होते. मात्र त्याला समाधानकार उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. २१ वर्षांपूर्वी तो अवैधरित्या बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो कोलकाता येथे वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याने भारतीय नागरिक असल्याचे बोगस आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर शासकीय दस्तावेज बनविले होते. या कागदपत्रांच्या आधारे त्याने एका एजंटच्या मदतीने बारा वर्षांपूर्वी बोगस भारतीय पासपोर्ट प्राप्त केले होते. या पासपोर्टवर तो कुवेत येथे नोकरीसाठी गेला होता.
दोन वर्षापूर्वी त्याचा पासपोर्ट संपुष्टात आला होता. त्यामुळे त्याने कुवेत येथून नवीन भारतीय पासपोर्ट मिळविला होता. याच पासपोर्टवर त्याने अनेकदा कुवेत-बांगलादेश-कुवेत असा प्रवास केल्याचे दिसून आले. बोगस दस्तावेज सादर करुन त्याने भारतीय पासपोर्ट मिळविले. याच पासपोर्टवर तो कुवेत, शारजा आणि बांगलादेशात गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी सुजता गणेश काळे यांच्या तक्रारीवरुन नुरुलविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.