बोगस भारतीय पासपोर्टवर सौदीला जाण्याचा प्रयत्न फसला
आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑगस्ट 2025
मुंबई, – बोगस भारतीय पासपोर्टवर सौदी अरेबिया येथे जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद आक्तर उज्जमान मोहम्मद अमानउल्ला शेख ऊर्फ अकरुल हलदर असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद आक्तर हा गेल्या 19 वर्षांपासून कोलकाता येथे वास्तव्यास होता, त्याने बोगस आधार, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रासह इतर दस्तावेजाच्या मदतीने भारतीय पासपोर्ट मिळवून सौदीमध्ये नोकरी मिळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विनोद अशोक पवार हे वरळीतील बीडीडी चाळीत राहत असून सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कामाला आहेत. सोमवारी रात्री आठ वाजता ते कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या विमानाने विदेशात जाणार्या प्रवाशांच्या इमिग्रेशन तपासणीचे काम सोपविण्यात आले होते. मंगळवारी रात्री दोन वाजता अकरुल हलदर नावाचा एक प्रवाशी इमिग्रेशनसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याला सौदी अरेबिया येथे जायचे होते. तिथे तो नोकरी करत असल्याचे सांगितले. त्याच्या पासपोर्ट आणि व्हिसाची पाहणीदरम्यान तो अनेकदा सौदीसह बांगलादेशात गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला बांगलादेशात जाण्याबाबत कारण विचारण्यात आले, मात्र त्याने इमिग्रेशन अधिकार्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली.
तपासात त्याने बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून 2006 साली बांगलादेशातून भारतात आल्याचे सांगितले. तेव्हापासून तो कोलकाता येथील 24 परगना, दरीकाउलतला परिसरात वास्तव्यास होता. त्याला विदेशात नोकरी करण्याची इच्छा होती, मात्र पासपोर्ट नसल्याने त्याला विदेशात जाता येत नव्हते. त्यामुळे त्याने एका एजंटच्या मदतीने बोगस पॅन, आधारकार्ड, मतदार ओळखपत्रासह इतर बोगस भारतीय नागरिक असल्याचे दस्तावेज बनविले होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्याने कोलकाता येथील पासपोर्ट कार्यालयातून बोगस भारतीय पासपोर्ट मिळविले होते. हा पासपोर्ट हरविल्यानंतर त्याने दुसरा नवीन पासपोर्ट मिळविला होता. याच पासपोर्टवर तो 2020 पासून अनेकदा सौदी अरेबिया येथे कामासाठी गेला होता.
गेल्या काही वर्षांपासून तो तिथेच कामावर होता. मे 2025 रोजी तो सुट्टीसाठी भारतात परत आला होता. सुट्टी संपल्यानंतर तो सौदीला जाण्यासाठी पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, यावेळी त्याला इमिग्रेशन अधिकार्यांनी संशयावरुन ताब्यात घेतले आणि त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला नंतर सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि परकीय नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला बोगस आधार, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रे, पासपोर्ट कोणी मिळवून दिले याचा पोलीस तपास करत आहेत.