बॉम्बच्या निनावी कॉलमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर खळबळ
पाहणीनंतर अफवा असल्याचे उघड; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – बॉम्बच्या निनावी कॉलमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय टर्मिनस एक विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण विमानतळाची पाहणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बची खोटी माहिती सांगून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहे. ज्या क्रमांकावर कॉल आला त्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गितांजली सागर नेरुरकर ही महिला माहीम येथे राहत असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून कामाला आहे. टर्मिनस एकजवळ तिची ड्यूटी असून तिथे येणार्या प्रवाशांच्या तक्रारीचे निरसण करणे, टर्मिनस एकवरील इतर कामकाजावर देखरेख करणे तसेच त्याची माहिती वरिष्ठांना देणे अशा प्रकारे तिच्या कामाची जबाबदारी आहे. शुक्रवारी २६ एप्रिलला सकाळी आठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर हजर झाली होती. यावेळी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या ड्यूटीसेल मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने टर्मिनस एक बॉम्ब असे सांगितले. त्यामुळे तिने तुम्ही कोण आणि कोठून बोलत आहे असे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने नवपाडा असे सांगितले. त्यानंतर तिने नवपाडा म्हणजे कोठून बोलत आहे असे सांगितल्यावर त्याने टर्मिनल एक, टर्मिनल एक, गेट क्रमांक एक….. बेस्ट ऑफ लक असे बोलून कॉल बंद केला.
या घटनेनंतर तिने तिच्या वरिष्ठांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांसह इतर सुरक्षारक्षकांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली होती, मात्र तिथे पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. काही वेळानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. संपूर्ण टर्मिनस एक आणि आसपासच्या परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनाही काही आक्षेपार्ह सापडले नाही. फोन करणार्या अज्ञात व्यक्तीने भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी बॉम्बची खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर गितांजली नेरुरकर यांच्या तक्रारीवरुन एअरपोर्ट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ५०५ (१), (ब), ५०६ (२), ५०७ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा एअरपोर्ट पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.