मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या ट्विटमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली होती. विमानतळावरील सर्व विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्ब असल्याचा तो ट्विट बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. बॉम्बच्या अफवेने आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी मध्यरात्री तीन वाजता नवी मुंबई ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईन ट्विटरवर एक मॅसेज आला होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन न्यूयॉर्कसह इतर ठिकाणी जाणार्या तीन विमानात बॉम्ब ठेवला आहे असे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे पूर्व-पश्चिम-उत्तर प्रादेशिक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण हे रात्रीच्या वेळेस तिथे गस्त घालत होते. ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्यासह स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी आणि कर्मचारी तिथे दाखल झाले होते. या पथकाने श्वान पथकाच्या मदतीने सर्व विमानाची तपासणी सुरु केली होती. या तपासणीदरम्यान पोलिसांना कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नव्हती. बॉम्बचा ट्विट येण्यापूर्वी विमानतळावरुन न्यूयॉर्कला एअर इंडियाचे एक विमानाने उड्डान केले होते. त्यामुळे या विमानाच्या वैमानिकाला ही माहिती देऊन दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅण्ड करण्यास सांगण्यात आले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते विमान लॅण्ड होताच सर्व प्रवाशांना खाली करुन तपासणी करण्यात ाअली. मात्र या विमानातही काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. सर्व विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तो ट्विट कोठून आणि कोणी पाठविला होता याचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल आणि गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.