मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – विदेशातून भारतात तस्करीमार्गे आणण्यात आलेल्या कोकेनचा मोठा साठा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनानाच्या अधिकार्यांनी जप्त करुन कोकेन तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका टांझानिया देशाच्या महिलेस या अधिकार्यांनी अटक केली असून तिच्याकडून 1718 ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात सतरा कोटी अठरा लाख रुपये इतकी किंमत आहेत. अटक महिलेविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत असल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध तपास यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच युगांडा येथून विमानातून कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर संबंधित अधिकारी अलर्ट झाले होते. विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात होती. यावेळी युगांडातील एन्टेबे येथून आलेल्या एका महिलेला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तिच्या बॅगेची तपासणी करताना त्यात या अधिकार्यांना खाऊचे काही पाकिट सापडले होते. त्याची तपासणी केल्यानंतर त्यात 1718 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. एनडीपीएस फिल्ट किट वापरुन जप्त केलेल्या पदार्थाची चाचणी करण्यात आली, त्यात ते कोकेन असल्याचे उघडकीस आले. हा साठा जप्त केल्यानंतर आरोपी महिलेविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
अटकेनंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तिला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात अटक महिला ही टाझांनिया देशाची नागरिक आहे. तिला ते कोकेन एका व्यक्तीने मुंबईत डिलीव्हरीसाठी दिले होते. त्यासाठी तिला विमान तिकिटासह काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. विमानतळाबाहेर ते कोकेन देण्यापूर्वीच तिला या अधिकार्यांनी अटक केली.