मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – नैरोबी येथून आणलेल्या कोकेनसह एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या प्रवाशाकडून या अधिकार्यांनी सुमारे अठरा कोटीचे 1789 ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला नंतर किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
ड्रग्ज तस्करीचे प्रकार घडू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेण्यात येत होती. याच दरम्यान नैरोबी व्हाया दोहा येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला संशयित आरोपी म्हणून या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्याच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना बॅगेत एक विशिष्ठ कप्पा केल्याचे दिसून आले. या कप्प्याची तपासणी केल्यानंतर त्यात 1789 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे अठरा कोटी रुपये आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, मुंबईत ते कोकेन तो कोणाला देणार होता. त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु आहे.