मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जुलै 2025
मुंबई, – बोगस व्हिसावर दुबईला गेलेल्या सात प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. दुबईहून डिपोर्ट होताच या सातजणांविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कौशिककुमार गोरधनभाई पटेल, अर्थकुमार विरेंद्रकुमार पटेल, महर्षी कल्पेशकुमार पटेल, पृथ्वीराजगिरी गजेंद्रगिरी गोस्वामी, भार्गव दिलीपकुमार जोशी, क्रुणालकुमार दशरथभाई प्रजापती आणि मोहम्मद जेद हुसैनखान पठाण अशी या सातजणांची नावे असून ते सर्वजण गुजरातचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विष्णू मधुकर सावंत हे विरारच्या डोंगरपाडा परिसरात राहत असून ते इमिग्रेशन अधिकारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना विविध देशातून येणार्या प्रवाशांच्या इमिग्रेशन तपासणीचे काम सोपविण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमोर सात प्रवाशांना दुबईहून डिपोर्ट केल्याचे एक प्रकरण आले होते. त्युळे या सातही प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडील पासपोर्ट, व्हिसासह इतर दस्तावेजाची पाहणी केल्यानंतर त्यांच्याकडे लॅक्सबर्ग (शेजान) देशाचा बोगस व्हिसा सापडला. त्यांनी बोगस व्हिसाद्वारे मुंबई-दुबई असा प्रवास केला होता. दुबई विमानतळावर गेल्यानंतर त्यांच्या व्हिसाची पाहणी करण्यात आली होती. त्यात त्यांच्याकडे असलेला व्हिसा बोगस असल्याचे उघडकीस येताच त्यांना पुन्हा मुंबईत पाठविण्यात आले होते.
अशा प्रकारे या सातही प्रवाशांनी बोगस स्टिकर व्हिसावर लावून प्रवास करुन इमिग्रेशन विभागाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विष्णू सावंत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित सातजणांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या सर्वांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस व्हिसावर दुबईला जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, त्यांना बोगस व्हिसा स्टिकर कोणी दिला याचा आता पोलीस तपास करत आहेत.