नूडल्सच्या पाकिटात लपवले दोन कोटीचे हिरे 

बँकॉंक हिरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रवाशाला अटक

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ एप्रिल २०२४
मुंबई, – नूडल्सच्या पाकिटातून हिरे तस्करी करू पाहणाऱ्याला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययु) ने अटक केली. सईद जाफर असे त्याचे नाव आहे. त्याला तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळणार होती. सईद हा ते हिरे बँकॉक येथे एकाला देणार होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. 
गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिरे/सोने तस्करीचे प्रकार वाढत चालले आहे. परदेशातील तस्कर हे कॅरिअर ( वस्तू नेणारे) याना विविध आमिष दाखवतात. खासकरून महिला, वृद्ध किंवा तरुणाना तस्करीच्या रॅकेट मध्ये ओढतात. परदेश दौरा आणि डॉलरचे आमिष दाखवून त्याच्या माध्यमातून ते तस्करी करतात. परदेशातील तस्कराचे सूत्रधार हे तस्करीसाठी रोज नवीन आयडिया शोधून काढतात. कधी शरीराच्या आत तर कधी वस्तू तर कधी खाद्य पदार्थ्यांच्या माध्यमातून सोने किंवा हिरे तस्करी करतात.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक जण बँकॉकला जाणार आहे. तो हिरे तस्करी करणार असल्याची माहिती एआययुला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. नुकताच सईद हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला एआययुच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्या बॅगेत एक नूडल्सचे पाकीट सापडले. त्या पाकीटा बाबत चौकशी केली. तेव्हा त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्याने त्या पाकिटाची तपासणी केली. त्या नूडल्सच्या पाकिटात दोन कोटी रुपयाचे हिरे होते. हिरे बाबत एआययु ने त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने ते हिरे आपण बँकॉकला नेणार असल्याचे सांगितले. कॅरिअर म्हणून आपल्याला काही पैसे मिळणार होते. ते हिरे बँकॉक येथे विमानतळावर एकाला देणार असल्याचे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. हिरे तस्करी प्रकरणी एआययु ने त्याचा जबाब नोंद करून अटक केली. सईद ला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तो ते हिरे नेमका कोणाला देणार होता, या पूर्वी त्याने अशा प्रकारची कामे केली होती का याचा तपास एआययु करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page