मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – विदेशातून आलेल्या हायड्रोपोनिक गांजासह सोन्याच्या तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश करुन अकरा प्रवाशांना अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी 32 किलो 698 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा तसेच 608 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने जप्त केले आहे. त्याची किंमत 33 कोटी 43 लाख 26 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस आणि सोने तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
विदेशातून सोने आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा प्रवाशांविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून आलेल्या तीन प्रकरणात चार प्रवाशांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत चारही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी 10 किलो 899 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला होता.
ही कारवाई ताजी असताना दुसर्या कारवाईत अन्य चार प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली होती. ते चौघेही बँकाँकहून आले होते. त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर या अधिकार्यांना 21 किलो 799 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा सापडला. या दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी 32 किलो 698 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 32 लाख 69 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
या कारवाईनंतर या अधिकार्यांनी अन्य तीन प्रवाशांना सोने तस्करीप्रकरणी अटक केली. ते तिघेही विदेशातून चोरट्या मार्गाने सोने घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याच्याकडे या अधिकार्यांना 24 कॅरेटचे 608 ग्रॅम वजनाचे सोने सापडले. त्याची किंमत 73 लाख 46 रुपये इतकी आहे. या घटनेनंतर सर्व प्रवाशांना वेगवेगळ्या कलमांतर्गत अटक करण्यात आली होती.