पोटातून ७७ कॅप्सुलमधून काढले पंधरा कोटीचे कोकेन

कॅप्सुलमधून कोकेनची तस्करी करणार्‍या प्रवाशाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मे २०२४
मुंबई, – विदेशात कॅप्सुलमधून कोकेनची तस्करी करणार्‍या एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्या पोटातून या अधिकार्‍यांनी ७७ कॅप्सुलमधून पंधरा कोटीचे कोकेनचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही दिवसांत विदेशातून होणार्‍या ड्रग्ज तस्करीच्या घटनेनंतर डीआरआयच्या अधिकार्‍यांनी प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची कसून तपासणी सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच विदेशात कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी या अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशात येणार्‍या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेण्यात सुरुवात केली. याच दरम्यान आरोपी प्रवाशाला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना काहीच सापडले नाही. मात्र त्याने कॅप्सुलमधून कोकेन आणल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला कोर्टात हजर करुन कोर्टाच्या आदेशावरुन जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांत त्याच्या पोटातून ७७ कॅप्सूल काढण्यात आले असून त्यात कोकेन असल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे पंधरा कोटी रुपये इतकी आहे. या घटनेनंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली. या कोकेनच्या मोबदल्यात त्याला विमान तिकिटासह काही रक्कम कमिशन म्हणून देण्याचे ठरले होते. त्याला ते कोकेन कोणी दिले आणि तो कोकेन कोणाला देणार होता याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page