झटपट पैशांसाठी गांजा तस्करी करणार्या इस्टेट एजंटला अटक
हायड्रोपोनिक गांजा आणून विक्रीचा पहिलाच प्रयत्न फसला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – इस्टेट एजंटच्या व्यवसायात जास्त पैसे मिळत नसल्याने केरळच्या एका इस्टेट एजंटने बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजा खरेदी करुन त्याची केरळमध्ये विक्रीची योजना बनविली. ठरल्याप्रमाणे तो तीन कोटीचा गांजा घेऊन आला, मात्र छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला गांजासह सीमा शुल्क विभागाने अटक केली. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी गांजा तस्करीचा त्याचा पहिलाच प्रयत्न फसला गेला आहे. मोहम्मद शरीफ असे या इस्टेट एजंटचे नाव असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून सोने आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरुद्ध या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून कोट्यवधी रुपयांच्या गांजा तस्करी होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना मोहम्मद शरीफ या प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर या अधिकार्यांना मॅगी, बूट आणि चॉकलेटचे काही पॅकेट सापडले. या पॅकेटची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना तीन किलो हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे तीन कोटी इतकी किंमत आहे.
तपासात मोहम्मद शरीफ हा मूळचा केरळचा रहिवाशी आहे. तो इस्टेट एजंट म्हणून काम करत होता. या कामात त्याला दरमाह वीस हजार रुपये मिळाले होते. त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळे गांजा तस्करीची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी तो बँकाँकला गेला होता. तिथे त्याने एका व्यक्तीने तीन कोटीचा गांजा खरेदी केला होता. त्यासाठी त्याने कर्ज काढले होते. याच पैशांतून त्याने गांजा खरेदी केला होता. हा गांजा केरळमध्ये विक्री करण्याची त्याची योजना होती. मात्र बँकाँकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यामुळे त्याचा गांजा विक्रीचा पहिलाच प्रयत्न फसला गेला. हा गांजा जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध या अधिकार्यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.