मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 जून 2025
मुंबई, – बँकॉकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजासह दोन भारतीय प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या दोन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी 3 किलो 474 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विदेशातून गांजा आणि गोल्ड तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर सीमा शुल्क विभाग अधिक सतर्क झाले आहे. अशा तस्कराविरुद्ध या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर मंगळवारी या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान दोन भारतीय प्रवाशी विमानतळाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच या दोघांनाही या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना डायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याचे वजन केल्यानंतर 3 किलो 474 ग्रॅम वजनाचे गांजा होता. त्याची सुमारे साडेतीन कोटी रुपये किंमत होती. चौकशीदरम्यान त्यांना तो गांजा बँकाँक येथे एका व्यक्तीने दिले होते. मुंबईत गेल्यानंतर त्यांना तो गांजा त्यांच्या एका सहकार्याला देण्यास सांगण्यात आले होते. याकामी त्यांना काही कमिशन आणि विमानाचे तिकिट देण्यात आले होते. मात्र गांजा विमानतळाबाहेर नेण्यापूर्वीच या दोघांनाही या अधिकार्यांनी अटक केली.