मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – पोटातून आणलेल्या कोकेन तस्करीचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश करुन एका विदेशी महिलेस अटक केली. फ्लोरेन्स अविनो इडनगसी असे या 43 वर्षीय महिलेचे नाव असून ती मूळची केनियाची रहिवाशी आहे. तिच्या पोटातून सहा कॅप्सूल काढण्यात आले असून त्यात 665 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 6 कोटी 65 लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. फ्लोरेन्सविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
फ्लोरेन्स ही केनियाची रहिवाशी आहे. 11 जुलैला ती नैरोबीहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिच्या पोटात काही कॅप्सूल असल्याचे उघडकीस येताच तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. कोर्टाची परवानगी घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्या पोटातून सहा कॅप्सूल काढण्यात आले होते. त्यात सुमारे साडेसहा कोटीचे 665 ग्रॅम वजनाचे कोकेन होते. कोकेनचा हा साठा जप्त केल्यानंतर तिच्याविरुद्ध या अधिकार्यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत तिला रविवारी या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर तिला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिला ते कोकेन कोणी दिले, ते कोकेन मुंबईत ती कोणाला देणार होती, तिने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा सीमा शुल्क विभागाचे अधिकारी तपास करत आहेत.