मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जुलै 2025
मुंबई, – बिस्कीट आणि चॉकलेटमधून आणलेल्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी विदेशातून आलेल्या पूजा लव्हप्रित लाल या महिलेस अटक करुन तिच्याकडून या अधिकार्यांनी सुमारे 62 कोटीचा 6 किलो 262 ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. ते कोकेन तिने तीनशेहून अधिक कॅप्सुलमधून भरुन चॉकलेट आणि बिस्कीटच्या आड आणले होते. मात्र तिचा हा प्रयत्न डीआरआयच्या अधिकार्यांनी हाणून पाडला. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढू लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. सोमवारी दोहाहून पूजा लाल ही महिला आली होती. संशयावरुन तिला डीआरआयच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर चॉकलेट आणि बिस्कीटचे काहीपाकिट सापडले होते. त्याची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना तीनशेहून अधिक कॅप्सुल सापडले. या कॅप्सुलमधून तिने कोकेन आणल्याचे उघडकीस आले. कॅप्सुलमधून या अधिकार्यांनी 6 किलो 261 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले.
आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 62 कोटी 62 लाख रुपये इतकी किंमत आहे. तपासात पूजा लाल ही मूळची पालघरची रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वीच ती दोहा येथे गेली होती. तिथेच तिला एका व्यक्तीने कोकेन असलेले बिस्कीट आणि चॉकलेट दिले होते. त्यासाठी तिला ठराविक रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखवून विमान तिकिट देण्यात आले होते. कोकेनचा साठा जप्त केल्यानंतर तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत नंतर तिला या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज तस्करी करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असून तिच्याकडून ते कोकेन कोण घेणार होते, तिने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा डीआरआयचे अधिकारी तपास करत आहे.