मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बँकॉकहून आणलेल्या विदेशी गांजासह एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या प्रवाशाकडून या अधिकार्यांनी ४८५६ ग्रॅम वजनाचा विदेशी गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत ४.८५६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जसहीत सोन्याच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात होती. ही मोहीम सुरु असताना रविवारी रात्री उशिरा आरोपी प्रवाशी बँकॉंकहून आला होता. त्याने त्याच्या ट्रॉली बॅगेतील खाऊच्या पॅकेटमध्ये विदेशी गांजा आणला होता. ही माहिती प्राप्त होताच या अधिकार्यांनी संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानासह खाऊच्या पॅकेटची तपासणी केली असता त्यात या अधिकार्यांना ४ किलो ८५६ ग्रॅम वजनाचे विदेशी गांजा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ४.८५६ कोटी इतकी किंमत आहे. या कारवाईनंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली.