मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बँकाँकहून आणलेल्या कोट्यवधी रुपयांचा मेथाकॅलोन-कोकेनचा मोठा साठा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत दोन प्रवाशांसह ड्रग्ज घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी सुमारे तीन किलोचा मेथाकॅलोन-कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बँकाँकहून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत आहे. काही प्रवाशांना हाताशी धरुन हायड्रोपोनिक गांजासह इतर ड्रग्जची तस्करी होत असल्याने अशा प्रवाशांविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून येणार्या विमानातून काही प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची या अधिकार्यांनी तपासणी सुरु केली होती.
याच दरम्यान विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन प्रवाशांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची तपासणी करताना या अधिकार्यांना 2 किलो 992 ग्रॅम वजनाचे मेथाकॅलोन-कोकेनचा साठा सापडला. चौकशीत त्यांना ते ड्रग्ज बँकाँक येथे एका व्यक्तीने दिले होते. हा साठा विमानतळावर बाहेर एक व्यक्ती असेल, त्याला देण्यास सांगण्यात आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या अधिकार्यांनी विमानतळाबाहेर साध्या वेशात पाळत ठेवली होती.
यावेळी या दोघांकडून ड्रग्ज घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. या तिघांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मेथाकॅलोन-कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपये किंमत आहे. याकामासाठी दोन्ही प्रवाशांना विमानाचे तिकिटासह काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती. या कमिशनपायी ते दोघेही ड्रग्ज पार्सल नेण्यास तयार झाले होते.