मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आणलेल्या सुमारे साडेपाच कोटीच्या विदेशी गांजासह एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी ५ किलो ५६५ ग्रॅम वजनाचे संशयित हायड्रोपोनिक वीडचा (गांजा) साठा जप्त केला आहे. अटक प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बँकॉंकहून काही प्रवाशी ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या मुंबई युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी बँकॉंकहून येणार्या प्रत्येक प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात होती. ही कारवाई सुरु असातनाच एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणीदरम्यान या अधिकार्यांना ५ किलो ५६५ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक वीडचा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५ कोटी ५६ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
हा साठा त्याने विविध प्लास्टिकमध्ये पॅक केले होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने ते पॅकेट सामानात ठेवलेल्या खाद्यपदार्थात लपवून आणले होते. त्यानंतर या प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, तो मुंबईत कोणाला देणार होता, यापूर्वीही त्याने ड्रग्जची तस्करी केली आहे. ड्रग्जसाठी त्याला संबंधित व्यक्तीने विमानाच्या तिकिटासह कमिशन देण्यात आले होते.