64 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह चार प्रवाशांना अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मार्च 2026
मुंबई, – सुमारे 64 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह एका विदेशी नागरिकासह चार प्रवाशांना हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यानी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी 64 किलो 394 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून हा साठा बँकाँक येथून आणण्यात आला होता. या चारही प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस कलामंतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर चौघांनाही किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून येणार्या विमानातून कोट्यवधी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी मंगळवारी बँकाँकहून आलेल्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.
ही कारवाई सुरु असताना या अधिकार्यांनी एका विदेशी नागरिकासह तीन भारतीय प्रवाशी अशा चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह त्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली होती. त्यात या अधिकार्यांना 64 किलो 394 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 64 कोटी 39 लाख रुपये इतकी किंमत आहेत. त्यांना हा गांजा बँकाँक येथे एका व्यक्तीने दिला होता.मुंबईत हा साठा त्यांच्या सहकार्यांना देण्यास सांगण्यात आले होते.
त्यासाठी त्यांना बँकाँक-मुंबई असा विमान तिकिटासह काही ठराविक रक्कमेचे कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या चारही प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर चारही प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चौघांनाही बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत बँकाँकहून आलेल्या अनेक प्रवाशांना कस्टम अधिकार्यांनी अटक केली असून त्यांच्या हजारो कोटीचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई अद्याप सुरु असल्याने कस्टम अधिकारी अधिक सतर्क झाले होते. विशेषता बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांची या अधिकार्यांकडून चौकशी करुन तपासणी केली जात आहे.