बँकॉकहून हायड्रोपोनिक गांजा तस्करीची मालिका सुरुच

कोल्हापूरच्या प्रवाशाला दहा कोटीच्या गांजासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2026
मुंबई, – बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजा तस्करीची मालिका सुरुच असून शनिवारी एका विशेष कारवाईत एका प्रवाशाला सुमारे दहा कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विशमानतळावर अटक केली. अमीत शंकर भक्त्यारपुरी असे या प्रवाशाचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून या अधिकार्‍यांनी 10 किलो 56 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमातर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत बँकाँकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होत आहे. आठवड्यातून एकदा-दुसरा प्रवाशी हायड्रोपोनिक गांजा घेऊन येत असल्याने अशा प्रवाशांवर कस्टम अधिकार्‍यांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी अमीत हा बँकाँकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या बॅगेत हायड्रोनिक गांजा असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्याला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांनी 10 किलो 56 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात दहा कोटी रुपये इतकी किंमत आहे. तपासात अमीत भक्त्यारपुरी हा कोल्हापूरच्या कोल्हापूर पोलीस स्टेशन, गुडलक टेलरजवळील भार्गव अपार्टमध्ये रुम क्रमांक दहामध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी तो बँकाँक येथे गेला होता. तिथेच त्याला एका व्यक्तीने हायड्रोपोनिक गांजा दिला होता.

हा गांजा त्याला मुंबईतील एका सहकार्‍याला देण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध या अधिकार्‍यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत त्याला नंतर या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page