बँकॉंकहून आणलेल्या ११ कोटीच्या गांजासह प्रवाशाला अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजा तस्करीप्रकरणी एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी ११ किलो ३२२ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय बाजारात याच गांजाची किंमत ११ कोटी ३२ लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला नंतर किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
स्पॉट प्रोफाईलिंगच्या आधारावर सीमा शुल्क विभागाने गुरुवारी सीमा शुल्क विभागाने विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना बँकॉंकहून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना ११ किलो ३२२ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याने हा गांजा व्हॅक्यूम सीलबंद प्लास्टिक पाऊचमध्ये लपवून आणला होता. हा साठा जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले होते. मुंबईत ते ड्रग्ज तो कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.