मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – सुमारे अकरा कोटीच्या कोकेनसह ब्राझिल देशाच्या एका महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकार्यांनी अटक केली. तिने पोटातून कोकेनची तस्करी केल्याचे उघडकीस आले असून तिच्या पोटातून 1096 ग्रॅम वजनाचे कोकेन या अधिकार्यांनी जप्त केले आहे. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत विदेशातून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. यातील बहुतांश गुन्ह्यांत प्रवाशी पोटातून कॅप्सूलद्वारे ड्रग्जची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे संशयित प्रत्येक प्रवाशांची या अधिकार्यांनी कसून तपासणी सुरु केली होती. ही कारवाई सुरु असताना साओ पाऊलोहून येणार्या विमानातून काही प्रवाशी ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिहाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी प्रत्येक संशयित प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान एका ब्राझिल देशाच्या महिलेस या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत तिने तिच्या पोटातून कोकेन असलेले कॅप्सूल आणल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला लोकल कोर्टाच्या परवानगीने जे जे या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्या पोटातून डॉक्टरांनी 100 कॅप्सुल काढले. त्यात 1096 ग्रॅम वजनाचे कोकेन होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे अकरा कोटी रुपये इतकी आहे. विमानतळाबाहेर तिला एका व्यक्तीला ते कोकेन देण्यास सांगण्यात आले होते. ते कोकेन ती कोणाला देणार होती याचा तपास सुरु आहे. कोकेनचा हा साठा जप्त करुन तिच्याविरुद्ध या अधिकार्यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.