मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – सुमारे अकरा कोटीच्या कोकेनसह एका विदेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याने कपड्याच्या आत कोकेन लपवून आणले होते. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करुन त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा प्रवाशी ब्राझिल देशाचा नागरिक असल्याचे सांगणयात आले.
गेल्या काही दिवसांत विदेशातून ड्रग्ज आणि सोने तस्करीचे प्रमाणे वाढल्याने अशा प्रवाशांविरुद्ध डीआरआयने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीत सुरु असताना ब्राझिल येथून काही प्रवाशी ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी ब्राझिलवरुन आलेल्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना या नागरिकाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात कपड्याच्या आत लपवून आणलेले सात पाऊच सापडले.
या पाऊचची तपासणी केल्यानंतर त्यात कोकेनचा साठा सापडला. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात अकरा कोटी रुपये इतकी किंमत आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याला या अधिकार्यांनी अटक केली. त्याला ते कोकेन कोणी दिले होते, मुंबईत तो कोकेन कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास डीआरआय करत आहेत.