मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंबई, – आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा तस्करीचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक करुन त्यांच्याकडून आठ कोटीचा गांजा जप्त केला आहे. सलमान साबीरअली शेख, बिपीनकुमार पटेल आणि निलेशभाई बाबूभाई दोंडा अशी या तिघांची नावे असून यातील बिपीनभाई आणि निलेशभाई हे दोघेही गुजरातचे रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तिघांनाही किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला प्राप्त झाली होती. त्यामुळे विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्यांनी तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना सोमवारी बँकाँकहून आलेल्या सलमानला या अधिकार्यांनी संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांनी दहा पॅकेट सापडले. ते पॅकेट उघडल्यानंतर त्यात हायड्रोपोनिक गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे पाच कोटी इतकी होती. दुसर्या कारवाईत बिपीनभाई आणि निलेशभाई या दोघांना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानात या अधिकार्यांना दहा खाऊचे पाकिट सापडले होते. त्यातून त्यांनी गांजा लपवून आणला होता. या पॅकेटमधून सुमारे तीन कोटीचा गांजाचा साठा या अधिकार्यांनी जप्त केला.
या तिन्ही प्रवाशांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिघांनाही या अधिकार्यांनी अटक केली. यातील बिपीनभाई आणि निलेशभाई हे दोघेही गुजरातचे रहिवाशी असून त्यांचा अनुक्रमे कपड्याचा तसेच हिरे दलालीचा व्यवसाय आहे. या दोघांनाही एका व्यक्तीने गांजा दिला होता. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गांजाची बॅग घेतल्यानंतर ते दोघेही बँकाँकहून मुंबईत आले होते. मुंबईत त्यांना ती बॅग एका व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले होते.