पोटातून कॅप्सूलद्वारे कोकेन तस्करीचा पर्दाफाश

२२ कोटीच्या कोकेनसह युगांडाच्या तीन नागरिकांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – पोटातून कॅप्सूलद्वारे कोकेन तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन युगांडा देशातील नागरिकांना या अधिकार्‍यांनी अटक करुन त्यांच्याकडून २१९७ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहेत. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिघांनाही किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विदेशातून ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी अशा ड्रग्ज तस्कराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच विदेशातून तीन युगांडाच्या नागरिक छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. या तिघांनी काही कॅप्सूल सेवन केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना दुसर्‍या किल्ला कोर्टात हजर करुन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची विनंती करण्यात होती. कोर्टाने परवानगी मिळताच या तिघांनाही जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पोटातून डॉक्टरांनी १७० कॅप्सुल काढण्यात आले होते. या कॅप्सुलमधून त्यांनी कोकेन आणल्याचे उघडकीस आले.

या कॅप्सूलमधून २ किलो १९७ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २२ कोटी रुपये इतकी आहे. कोकेनचा हा साठा जप्त केल्यानंतर या तिन्ही नागरिकांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांनाही अटक करुन पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ते तिघेही युगांडाचे नागरिक असून त्यांना ते कोकेन युगांडा येथे एका व्यक्तीने दिले होते. ते कोकेन त्यांना मुंबईत त्याच्या सहकार्‍याना द्यायचे होते, मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या तिघांनाही या अधिकार्‍यांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page