मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – विदेशातून आणलेल्या गांजा तस्करीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली असून त्यांच्याकडून २२ कोटी ४७ लाखांचा गांजाचा साठा जप्त केला आहे. प्रविणकुमार अनिलकुमार सिंग, सुरज दिलीपभाऊ उपाध्याय, शिवम बलिंदर नरेशभाई यादव, मयांक बलराम दिक्षीत, निगम हसमुख रावल आणि सागर मार्कशिलभाई वेधीया अशी या सहा प्रवाशांची नावे असून ते सर्वजण मूळचे गुजरातच्या सुरत आणि राजकोटचे रहिवाशी आहेत. या सर्वांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशात सोने आणि ड्रग्जच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली होती. अशा प्रवाशांविरुद्ध कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना विदेशात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती या अधिकार्यांनी मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह सामानाची झडती घेतली होती. शुक्रवारी बॅकॉंहहून आलेल्या चार प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या टॉली बॅगेची तपासणी केली असता त्यात या अधिकार्यांना १३ हजार ९२३ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा सापडला. या गांजाची किंमत १३ कोटी ९२ लाख ३० हजार रुपयांची किंमत आहेत. याच गुन्ह्यांत नंतर प्रविणकुमार, सुरज, शिवम आणि मयांक या चारही प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली होती.
ही कारवाई ताजी असतानाच शनिवारी निगम रावल व सागर वेधिया या दोन प्रवाशाला ताब्यात घेतले होते. या दोघांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे ८ किलो १५५ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा सापडला. या गांजाची किंमत आठ कोटी पंधरा लाख रुपये आहे. हा साठा जप्त केल्यानंतर या दोन्ही प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली. दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी २२ कोटी ४७ लाखांचा गांजाचा साठा जप्त केला आहे. सहाही आरोपी सुरत आणि राजकोटचे रहिवाशी असून काही दिवसांपूर्वीच ते सर्वजण बँकॉंक येथे गेले होते. तेथून ते सर्वजण गांजा घेऊन आले होते. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला देणार होते, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु आहे. या सहाही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.