गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 3.85 कोटीची फसवणुकीनंतर धमकी
दुबईच्या भाईमार्फत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून एका 58 वर्षांच्या महिलेची 3 कोटी 85 लाखांची फसवणुक केल्यानंतर पैशांची मागणी करणार्या महिलेला आरोपीने धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुबईच्या भाईमार्फत तिच्यासह तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीच्या एअरपोर्ट पोलिसांनी हरिहरण ऊर्फ हरी जनार्दन अय्यर या साईश फिनकॅप कंपनीच्या मालकाविरुद्ध फसवणुकीसह खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत हरिहरणची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्याचे दुबईतील भाईच्या कनेक्शनची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
58 वर्षांची तक्रारदार महिला ही नवी मुंबईतील खारघरची रहिवाशी असून गेल्या एक वर्षांपासून ती सध्या दुबईत वास्तव्यास आहे. चार वर्षांपूर्वी तिची साईश फिनकॅप कंपनीचे मालक हरिहरण याच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्याने तिला त्याची गुंतवणुक कंपनी असून या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केली आहे. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळाला आहे असे सांगून तिला त्याच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर तिला वार्षिक अठरा टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यासह तिच्या बहिणीला वारसा हक्काने त्यांच्या वडिलांकडून काही पैसे मिळाले होते. हीच रक्कम तिने हरिहरणच्या कंपनीत गुंतवुणकीचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे तिच्यासह तिच्या बहिणीने साईश फिनकॅप कंपनीत टप्याटप्याने 3 कोटी 85 लाखांची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात त्यांना अकरा महिन्यांत गुंतवणुकीची रक्कम अठरा टक्के परताव्यासह देण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र अकरा महिने उलटूनही त्याने त्यांना पैसे दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याने एका चित्रपटाची निर्मिती केली होती, या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे ती पैशांसाठी सतत त्याच्याकडे पाठपुरावा करत होती. यावेळी त्याने तिला तु दुबईत राहतेस ना. तिथे माझी काही अंडरवर्ल्ड डॉन भाईंशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पुन्हा पैशांसाठी कॉल करु नकोस नाहीतर भाईमार्फत दुबईतच तिच्यासह तिच्या कुटुंबियांचा गेम करुन अशी धमकी दिली होती.
या धमकीनंतर ती 18 मार्चला मुंबईत आली होती. हरिहरणकडून गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून तिच्यासह तिची बहिणीची फसवणुक झाली होती. पैशांची मागणी केल्यानंतर त्याने दुबईतील भाईमार्फत तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडेच खंडणीची मागणी केली होती. या प्रकारानंतर तिने एअरपोर्ट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून हरिहरणविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत खंडणीविरोधी पथकाला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर तिच्या तक्रारीनंतर एअरपोर्ट पोलिसांनी हरिहरण याच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून हरिहरण अय्यरची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.