मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आणलेल्या गांजासह तिघांना हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. त्यात एका प्रवाशासह त्याच्या दोन सहकार्याचंा समावेश आहे. युसूफ नूर, समीर आणि अब्दुल सबीथ बी अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी ४ किलो ८९० ग्रॅम वजनाचे सुमारे पाच कोटीचे उच्च प्रतीचा गांजाचा साठा जप्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून ड्रग्ज आणि सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली होती. अशा तस्करीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून विदेशात येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची आंतरराष्ट्रीय विमानतळावर कसून तपासणी केली जात होती. ही मोहीम सुरु असताना बँकॉंकहून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा तस्करीमार्गे आणला जाणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यामुळे बँकॉंकसह इतर देशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान विमानतळावर आलेल्या युसूफ नूर या प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात काही खाऊचे पाकिट सापडले. त्यात त्याने गांजा लपवून आणला होता. ४ किलो ८९० ग्रॅम वजनाच्या या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे.
हा गांजा त्याला विमानतळाबाहेर असलेल्या दोन व्यक्तीच्या स्वाधीन करायचा होता. त्यामुळे या अधिकार्यांनी विमानतळावर त्याची वाट पाहणार्या समीर आणि अब्दुल या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांना युसूफ नूरकडून हा गांजा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यास सांगण्यात आले होते. या तिघांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर रविवारी दुपारी तिन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील युसूफ हा दिल्ली तर समीर आणि अब्दुल चेन्नईचे रहिवाशी आहेत.