आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने-विदेशी चलन तस्करीचा पर्दाफाश
98 लाखांच्या सोन्यासह विदेशी चलनासह तीन प्रवाशांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्यासह विदेशी चलनाचा कस्टम अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली असून या तिन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी सुमारे 98 लाख रुपयांचे विदेशी चलनासह सोने जप्त केले आहेत. अटकेनंतर तिन्ही प्रवाशांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्जसहीत सोने आणि विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मंगळवारी बेहरीन आणि दमन येथे दोन प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना कस्टम अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्यांच्या सामानाच्या ट्रालीची तपासणी केल्यानंतर त्यातील जाहिरातीच्या स्ट्रिकरखाली या दोघांनी सोने लपवून आणल्याचे उघडकीस आले. या कारवाईत या अधिकार्यांनी 24 केटी 247 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार जप्त केले. त्याची किंमत सुमारे 22 लाख रुपये इतकी आहे.
ही कारवाई ताजी असताना अन्य एका प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो मुंबईहून बँकाँकला जात होता. त्याच्या सामानाच्या झडतीत या अधिकार्यांना 90 हजार अमेरिकन डॉलर सापडले. त्याची किंमत 76 लाख 23 हजार रुपये इतकी आहेत. या दोन्ही कारवाईनंतर तिन्ही प्रवाशांना सोने आणि विदेशी चलन तस्करीप्रकरणी या अधिकार्यांनी अटक केली. या तिघांना ते सोने आणि विदेशी चलन कोणी दिले, त्यांनी यापूर्वीही सोने आणि विदेशी चलनाची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु आहे.