आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने-हिरे तस्करीप्रकरणी तिघांना अटक
बँकॉंकहून आणलेले सोने व दुबईत घेऊन जाणारे हिरे जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने-हिरे तस्करीचा सीमा शुल्क अधिकार्यांनी पर्दाफाश करुन तीन प्रवाशांना अटक केली आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली. या तिघांकडून या अधिकार्यांनी अडीच कोटीचे सोने आणि हिरे जप्त केले आहे. यातील दोन प्रवाशी १ कोटी ८० लाख रुपयांचे २ किलो ४६५ ग्रॅम वजनाचे सोने बँकॉंकहून घेऊन आले तर एक प्रवासी सुमारे ७५ लाखांचे हिरे घेऊन दुबईला जात असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून ड्रग्ज, सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने कस्टम अधिकार्यांनी अशा प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण बँकॉकहून सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती कस्टम अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकॉंकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान बँकॉंकहून आलेल्या दोन प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह त्यांच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांनी २४ कॅरेटचे सोन्याचे धूळ सापडली. २ किलो ४६५ ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत १ कोटी ८० लाख रुपये इतकी आहे. ते सोने जप्त करुन या दोन्ही प्रवाशांवर नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
ही कारवाई ताजी असताना शुक्रवारी अन्य प्रकरणात एका प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. हा प्रवाशी दुबईला जात होता. त्याच्याकडे कापलेले आणि पॉलिश केलेले २१ कॅरेट वजनाचे सव्वापाच लाखांचे सुट्टे हिरे तसेच पॉलिश केलेले ६९ लाख ६९ लाखांचे २२३ कॅरेटचे इतर सुट्टे हिरे सापडले. या दोन्ही हिर्यांची किंमत सुमारे ७५ लाख रुपये इतकी आहे. ते हिरे जप्त केल्यानंतर त्याला नंतर या अधिकार्यांनी अटक केली. शरीरात लपूवन ते तिघेही सोने आणि हिरे तस्करी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला.