आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने-ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

25 कोटीच्या सोने-ड्रग्जसह तीन प्रवाशांसह पाचजण अटकेत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – आंतररराष्ट्रीय विमानतळावर सोने-ड्रग्ज तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पाचजणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन प्रवाशांसह दोन खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍याचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध सोने तस्करीसह एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत या अधिकार्‍यांनी 25 कोटी 51 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा, कोकेन आणि सोन्याची पावडर जप्त केली आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत विदेशात गांजा आणि सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. अशा आरोपींच्या अटकेसाठी सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. विदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी घेतली होती. ही कारवाई सुरु असताना पहिल्या कारवाईत या अधिकार्‍यांनी दोन भारतीय प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून 11 कोटी 88 लाखांचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. बँकाँक येथून येणार्‍या विमानातून काही प्रवाशी ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर शनिवारी रात्री उशिरा या अधिकार्‍यांनी बँकाँकहून येणार्‍या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.

याच दरम्यान दोन भारतीय प्रवाशांना या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे 11 किलो 881 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत 11 कोटी 88 लाख रुपये इतकी आहे. हा गांजा त्यांनी व्हॅक्यूम सील केलेल्या पॅकेटमधून लपवून आणले होते. गांजा जप्त केल्यानंतर या दोन्ही प्रवाशांना संबंधित अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या कारवाईत अनेचार्ल्स जोससेलिन कौमे या नायजेरीयन नागरिकाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. गुरुवारी अनेचार्ल्स हा सिएरा लिओनहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विर्माीनतळावर आला होता. त्याने त्याच्या पोटातून कॅप्सूलद्वारे ड्रग्ज आणल्याचा या अधिकार्‍यांना संशय आला होता. त्यामुळे त्याला लोकल कोर्टाच्या परवानगीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांत त्याच्या पोटातून डॉक्टरांनी 67 कॅप्सूल बाहेर काढले. या कॅप्सूलमध्ये 1 किलो 139 ग्रॅम वजनाचे कोकेन होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 11 कोटी 39 लाख इतकी आहे. कोकेन जप्त केल्यानंतर अनेचार्ल्सविरुद्ध या अधिकार्‍यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना गांजासह कोकेन कोणी दिले, हा ड्रग्जचा साठा ते कोणाला होते याची या अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु आहे.

तिसर्‍या कारवाईत विमानतळावरील खाजगी कंपनीचे कर्मचारी खुशीलाल विजयकुमार यादव आणि मोहम्मद आमीर अब्दुल हमीद डॉक्टर या दोघांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. या दोघांकडून तस्करीमार्गे आणलेले सव्वाचारद कोटीची सोन्याची पावडर या अधिकार्‍यांनी जप्त केली आहे. सोने तस्करीच्या गुन्ह्यांत काही कर्मचारी सक्रिय असल्याची माहिती प्राप्त होताच या अधिकार्‍यांनी विमानतळावरील संशयास्पद वावरणार्‍या काही कर्मचार्‍यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. रविवारी खुशीलाल यादव याला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याने त्याच्या ट्राऊजरमध्ये काही कॅप्सुल लपवून आणले होते. त्यात या अधिकार्‍यांना 2 कोटी 81 लाख रुपयांची सोन्याची पावडर सापडली.

ही कारवाई ताजी असताना दुसर्‍या कारवाईत या अधिकार्‍यांनी मोहम्मद आमीर या कर्मचार्‍याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे या अधिकासर्‍यांनी चार कॅप्सुल जप्त केले. त्यात 1 कोटी 43 लाख रुपयांची सोन्याची पावडर सापडली. या दोन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी दहा कॅप्सुलमधून सुमारे सव्वाचार कोटीची 4 किलो 440 ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर जप्त केली आहे. सोने तस्करीच्या गुन्ह्यांत नंतर या दोघांना या अधिकार्‍यांनी अटक केली. सोने आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केलेल्या पाचही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page