सव्वाकोटीच्या गोल्ड तस्करीप्रकरणी प्रवाशाला अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सुमारे सव्वाकोटी रुपयांच्या गोल्ड तस्करीप्रकरणी मोहम्मद वसीफ ताहिरअली शेख या 27 वर्षांच्या प्रवाशाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद वसीफ हा मूळचा गुजरातचा सुरतचा रहिवाशी असून मंगळवारी तो त्याच्या पत्नीसोबत बँकाँकहून मुंबईत आला होता. यावेळी त्याच्या शरीरातून या अधिकार्यांनी 1530 ग्रॅम वजनाचे सोन्याची पावडकर जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशातून मोठ्या प्रमाणात गोल्ड तस्करीचे प्रमाण वाढल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अशा गोल्ड तस्करी करणार्या प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच बँकाँक येथून काही प्रवाशी गोल्ड तस्करी करणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्य प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही कारवाई सुरु असताना मोहम्मद वसीफ व त्याची पत्नी रुबीना शेख या दोघांनाही या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची एक्स रे मशिनद्वारे तपासणी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या शरीरातून गोल्ड आणल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्याकडून या अधिकार्यांनी 1530 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. त्याची किंमत 1 कोटी 26 लाख रुपये इतकी आहेत.
गोल्ड तस्करीसाठी या दोघांनाही प्रत्येकी चाळीस हजाराचे कमिशन तसेच बँकाँक-मुंबई विमानाचे तिकिट देण्यात आले होते. शेख पती-पत्नी हे गुजरातच्या सुरत, नानावटचे रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी ते दोघेही फिरण्यासाठी बँकाँकला गेले होते. तिथे त्यांना एका व्यक्तीने गोल्ड दिले होते. मुंबई विमानतळावर त्यांना एका व्यक्तीला ते गोल्ड देण्यास सांगण्यात आले होते, मात्र त्यापूर्वी या दोघांनाही या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत नंतर मोहम्मद वसीफ याला या अधिकार्यांनी अटक करुन किल्ला कोर्टात हजर केले होते. यावेळी त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.