मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – सुमारे पाच कोटीच्या गोल्ड तस्करीप्रकरणी दोघांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. नितीन दशरथ इंगले आणि हर्षल अनिल खरात अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून या अधिकार्यांनी 5 किलो 750 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी विमानतळावरील एका कॉन्ट्रक्टरकडील कर्मचारी असून ते दोघेही कपड्यातून ते सोने घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून मोठ्या प्रमाणात गोल्ड तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना विमानतळावरील काही कॉन्ट्रक्टरवर कामावर असलेले कर्मचारी अशा तस्करांना गोल्ड तस्करीच्या गुन्ह्यांत मदत करत असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे विमानतळाबाहेर जाणार्या प्रत्येक कर्मचार्यावर कस्टम अधिकार्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
याच दरम्यान शनिवारी नितीन इंगले हा कर्मचारी विमानतळाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला कस्टम अधिकार्यांनी चौकशसाठी ताब्यात घेतले होते. त्याने घातलेल्या जॅकेटची तपासणी केली असता त्यात या अधिकार्यांना 2 किलो 947 ग्रॅम वजनाचे मेणातील सोन्याचे धूळ असलेले सहा पाऊच सापडले. त्याची किंमत 2 कोटी 48 लाख रुपये इतकी आहे.
ही कारवाई सुरु असताना या अधिकार्यांनी हर्षल खरात याला ताब्यात घेतले होते. त्याच्या जॅकेटच्या खिशातून या अधिकार्यांनी 2 किलो 950 ग्रॅम वजनाचे मेणातील सोन्याचे धूळ असलेले सहा पाऊच जप्त केले. त्याची किंमत 2 कोटी 62 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 5 किलो 750 ग्रॅम वजनाचे गोल्ड जप्त केले होते. त्याची किंमत 5 कोटी 10 लाख रुपये इतकी आहेत. गोल्ड तस्करीप्रकरणी या दोघांविरुद्ध नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती.