सोन्याच्या तस्करी केल्याप्रकरणी दोन विदेशी महिलांना अटक
सीमा शुल्क विभागाची कारवाई; १९.१५ कोटीचे सोने जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – नैरोबी येथून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोन विदेशी महिलांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या दोन्ही महिलांकडून या अधिकार्यांनी ३२ किलो ७९० ग्रॅम वजनाचे ९८ सोन्याचे तुकडे जप्त केले आहे. त्याची किंमत १९ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे.
गेल्या काही दिवसांत विदेशातून ड्रग्ज, सोने आणि विदेशी चलनाच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरोधात सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच नैरोबी येथून काही प्रवाशी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर विदेशातून विशेषता नैरोबी येथून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली होती. सोमवारी नैरोबी येथून आलेल्या दोन महिलांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या अर्ंतवस्त्रासह कपडे आणि सामानाची झडतीदरम्यान या अधिकार्यांना ३२ किलो ७९० ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटचे गोल्ड मेल्टेड बारचे ९८ तुकडे सापडले. त्याची किंमत १९ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. सोने तस्करीसाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशनसह विमानाचे तिकिट देण्यात आले होते. सोने तस्करीप्रकरणी या दोन्ही महिलांना नंतर या अधिकार्यांनी अटक केली. त्यांना ते सोने कोणी दिले आणि सोने ते कोणाला देणार होते, त्यांनी यापूर्वीही सोन्याची तस्करी केली होती का याची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.