विमानतळावर ७.६९ कोटीच्या सोने तस्करीचा पर्दाफाश
बोगस ओळखपत्रांचा वापर करुन प्रवास करणार्या प्रवाशांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – जयपूरहून मुंबईत येणार्या विमानातून सोने तस्करीचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्यांना यश आले आहे. याप्रकरणी दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अधिकार्यांन अटक केली असून या दोघांनी बोगस ओळखपत्रांचा वापर करुन विमानातून प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जप्त केलेले सोने सुमारे साडेनऊ किलो वजनाचे असल्याचे सांगण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय विमातळावर सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरुद्ध संबंधित अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जयपूरहून मुंबईत येणार्या विमानातून काही प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर जयपूरहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्यांनी झडती सुरु केली होती. ही कारवाई सुरु असताना दोन प्रवाशांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना साडेनऊ किलो वजनाचे सोने सापडले. त्याची किंमत ७ कोटी ६९ लाख इतकी आहे. चौकशीदरम्यान त्यांनी ते सोने कुवेतहून आणले होते. त्यासाठी त्यांनी बोगस ओळखपत्रांचा वापर केला होता. या बोगस ओळखपत्रांच्या आधारे त्यांनी विमानातून प्रवास केल्याचे उघडकीस आले. सोने तस्करीचा हा प्रकार उघडकीस येताच या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना ते सोने कोणी दिले, ते सोने त्यांना कोणाला द्यायचे होते, त्यांनी बोगस ओळखपत्र कुठून तयार केली याचा आता तपास सुरु आहे.